सैराट जोडप्यासह नातेवाईकांना मारहाण !

Foto


वैजापूर:  सव्वा महिन्यापूर्वी घरातून पसार झालेले सैराट जोडपे वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे परतले. ही माहिती मुलीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी नालेगाव येथे जाऊन सैराट जोडप्यासह मुलांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली. या मारहाणीत पाचजण गंभीर जखमी झाले असून, जखमींवर औरंगाबाद येथील घाटीत उपचार सुरू आहेत.

 वैजापूर तालुक्यातील साकेगाव येथील एका तरुणीची व नालेगाव येथील तरुणाची एका लग्‍न समारंभात ओळख झाली होती. यावेळी या दोघांनी एकमेेकांचा मोबाईल नंबर घेतला. हळूहळू ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तरुण व तरुणींनी लग्‍न करायचे ठरवले होते. याबाबत दोघांनीही घरच्या मंडळींना माहिती दिली होती. मात्र, तरुणीच्या घरच्यांनी याला साफ नकार दिला होता. तरुणाच्या घरच्यांनी मात्र हा विषय तरुणावर सोपवला होता. अखेर तरुण-तरुणींनी 18 एप्रिल रोजी घरातून पळून जात रीतसर न्यायालयात जाऊन लग्‍न केले. मागील महिन्याभरापासून ते पसार होते. अखेर दोन दिवसांपूर्वी सदर तरुण-तरुणी लग्‍न करून तरुणाच्या घरी दाखल झाले. ही माहिती तरुणीच्या घरी समजली. त्यांनी थेट नालेगाव येथे तरुणाच्या घरी जाऊन ऱाडा केला. यात सैराट जोडप्यासह सदर तरुणाचे पाच नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे नालेगाव येथे तणावाचे वातावरण आहे. ही माहिती शिऊर पोलिस ठाण्याला कळताच पोलिसांनी नालेगाव येथे धाव घेऊन मुलीकडील नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत अद्याप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

यापूर्वीही केला होता पलायनाचा प्रयत्न......

यापूर्वी सदर तरुण-तरुणीने घरातून पळून जाऊन लग्‍न करण्याचा बेत आखला होता. मात्र, याची कुणकुण मुलीच्या घरच्यांना लागली. त्यामुळे हा बेत फसला होता. त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी मुलीची समजूत काढली होती;पण तरीही मुलीने 18 एप्रिल रोजी घरातून पळून जाऊन नालेगावच्या त्या तरुणासोबत अखेर लग्‍न केले.